• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

३१ मे पूर्वी मागण्या मंजूर न झाल्यास आंदोलनाचा इशारा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विक्रम, मिनिडोअर चालक मालक संघाकडून जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना विविध मागण्यांचे निवेदन, ३१ मे पूर्वी मागण्या मंजूर न झाल्यास आंदोलनाचा इशारा

वावोशी : जतिन मोरे

कोरोना या संसर्गजन्य विषाणूने संपूर्ण जगात थैमान घातले असून या विषाणूची झळ देशासह महाराष्ट्रालाही लागली असून या रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून केंद्र शासनाने देशात लॉकडाऊन घोषित केला परंतू याचा परिणाम लहान मोठे उद्योगधंदे, सरकारी तसेच खाजगी प्रवासी वाहतूक सेवेवर झालेला दिसून येत आहे. या लॉकडाऊनमूळे रिक्षा, सहा आसनी विक्रम मिनिडोअर, इको, टाटा मॅजिक या खाजगी वाहतूक सेवा ठप्प झाल्याने हा व्यवसाय करणाऱ्या चालक, मालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील विक्रम मिनिडोअर चालक मालक संघाकडून आपल्या विविध मागण्यांसह आर्थिक सहकार्य करावे याकरिता रायगडचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी रायगड विक्रम मिनिडोअर चालक मालक संघाचे अध्यक्ष विजय पाटील, उपाध्यक्ष प्रमोद पाटील, खजिनदार शशिकांत पाटील, आदेश मोरे, शंकर पाटील, विकास पारंगे,राजू भंडारी, दिपक म्हात्रे, बाबुराव शेडगे,परवेझ कापसे,विलास काकडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घोषित केलेल्या लॉकडाऊनमूळे ग्रामीण भागातील खाजगी प्रवासी वाहतुकीसाठी लाईफलाइन समजल्या जाणाऱ्या रिक्षा,विक्रम, मिनिडोअर यांची वाहतूक सेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे चालक मालक फार मोठ्या संकटात सापडला आहे. हा व्यवसाय करणाऱ्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी बँकेचे कर्ज काढून हि वाहने खरेदी केली आहेत,तर काही तरुण भाडेतत्त्वावर हा व्यवसाय करीत आहेत. अशातच लॉकडाऊनमुळे हा व्यवसाय बंद करावा लागल्याने वाहनांच्या कर्जाचे हप्ते कसे फेडायचे आणि आपल्या कुटुंबियांचे उदरनिर्वाह कसे करायचे असा प्रश्न या व्यावसायिकांना पडला आहे आणि ही परिस्थिती महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तीनवेळा ईमेलद्वारे निवेदन सादर करूनही या निवेदनावर त्यांच्याकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नसल्याने पुन्हा एकदा दि. २० मे रोजी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्यामार्फत आपल्या या मागण्या शासन दरबारी पोहोचविण्याकरिता रायगड जिल्हा चालक मालक संघाकडून निवेदन देण्यात आले आहे. आपल्या या निवेदनात पुढील मागण्यांचा समावेश करण्यात आला आहे.

-----------------------------------------------------------------

रायगड जिल्हा विक्रम मिनिडोअर चालक मालक संघटनेच्या मागण्या :

१.कामावर न जाणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना दिला जाणारा पगार त्वरित बंद करण्यात यावा.

२.केजरीवाल सरकारने टॅक्सी/रिक्षा चालकांच्या खात्यात रक्कम जमा करून ज्या प्रमाणे मदत केली त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने प्रत्येक टॅक्सी/रिक्षा बॅच, परमिट धारकाला लॉक डाऊन कालावधीकरिता प्रति महिना ८ ते १० हजार नुकसान भरपाई देण्यात यावी.

३. विक्रम, मिनिडोअर चालकांची आर्थिक स्थिती लक्षात घेता कोणत्याही प्रकारचा रोड टॅक्स आणि वाहनांच्या विम्याच्या मुदतीत २ वर्षाकरिता वाढवून द्यावी.

४. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध स्तरातील घटकांना आर्थिक मदत आणि सवलतींच्या घोषणा दिल्या तशा प्रकारच्या सवलती या व्यवसायाच्या अनुषंगाने जाहीर करण्यात याव्यात.

५. रायगड जिल्ह्यातील MMRTA क्षेत्रातील वाहनांची वयोमर्यादा २० वर्षावरून २५ वर्षे तर RTA क्षेत्रातील वाहनांची वयोमर्यादा राज्यातील इतर जिल्ह्याप्रमाणे २५ वर्षावरून ३० वर्षे करावी.

या मागण्यांना ३१ मे पर्यंत न्याय न मिळाल्यास १ जुन नंतर परप्रांतीयांप्रमाणे रस्त्यावर उतरून उद्रेक झाल्यास याची जबाबदारी शासनावर राहील असा इशारा रायगड जिल्हा विक्रम मिनिडोअर चालक मालक संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील यांनी दिला आहे.