- हक्कासाठी आंदोलन
सोनावणे कुटुंबियांना मारहाण करणाऱ्या जातीयवाद्यांवर कारवाई करण्यात यावी अन्यथा २३ जूनला उपोषण..
न्हावंडे येथील काशीनाथ सोनावणे यांच्या कुटुंबियांना मारहाण करणाऱ्या जातीयवाद्यांवर कारवाई करण्यात यावी अन्यथा २३ जूनला तहसील कार्यालयासमोर उपोषण
खालापूर : जतिन मोरे
खालापूर तालुक्यातील न्हावंडे येथील काशीनाथ सोनावणे आणि त्यांच्या पत्नी सुमन सोनावणे यांच्यावर जातीय द्वेषातून करण्यात आलेल्या मारहाणीमुळे या वृद्ध दाम्पत्यांनी खालापूर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यास धाव घेतली परंतू पोलीसांनी तक्रार दाखल करून घेण्यास दिरंगाई करत अदखलपात्र गुन्हा नोंद करून आरोपींची कोणत्याही प्रकारची चौकशी केली नाही. त्यामुळे सदरील आरोपींकडून आमच्या जीवाला धोका निर्माण झाला असून जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येऊन आम्हाला न्याय मिळवून द्यावा याकरिता काशिनाथ सोनावणे आणि त्यांच्या पत्नी सुमन सोनावणे यांच्याकडून २३ जून रोजी खालापूर तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येणार आहे.
खालापूर तालुक्यातील न्हावंडे या गावात बौद्ध समाजाची पाच घरे असून काशीनाथ सोनावणे यांचे घरासमोर मराठा समाजाची घरे असून त्यांचे सांडपाणी हे सोनावणे यांच्या घरासमोर येऊन साचते आणि त्याच्या दुर्गंधीचा नाहक त्रास सहन करावा लागत असल्यामुळे काशिनाथ सोनावणे यांनी ग्रामपंचायतीमध्ये याबाबत अर्ज देऊन सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यात यावी असे अर्ज करण्यात आले. परंतु उपसरपंच संकेत हडप यांनी या सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी काशीनाथ सोनावणे यांच्या घरासमोरच आणि रस्त्याच्या मध्यभागी शोष खड्डा खणण्यास सुरुवात केली. त्यावेळी सोनावणे यांनी हरकत घेऊन सदरील शोषखड्डा रस्त्याच्या पुढील भागात खोदण्यास सांगितले. परंतु उपसरपंच संकेत हडप याने मनात राग ठेऊन आधीच्या ठिकाणीच शोष खड्डा खणण्यास सांगितले तसेच या कामात सोनावणे यांनी हरकत घेतल्याचा राग मनात धरून संकेत हडप, किरण हडप आणि नातेवाईक यांनी काशिनाथ सोनावणे यांचा नळ देखील मोडून टाकला. यावेळी सुमन सोनावणे यांनी प्रतिकार केला असता संकेत हडप यांनी मलाही मारहाण केली आणि मी या गावचा उपसरपंच आहे. मी सांगेल तसेच होणार, तुम्ही कुठेही जा तुमची तक्रार कोणीही घेणार नाही आणि कुणीही माझे वाकडे करू शकत नाही. तुझा नवरा माझ्याविरुद्ध अर्ज करतो त्याला लई माज आलाय तो आम्ही जिरवणार असे बोलून त्यांनी आमची टीव्ही केबल देखील तोडून टाकली. त्यामुळे सुमन सोनावणे यांनी खालापूर पोलीस ठाण्यात उपसरपंच संकेत हडप आणि इतर लोकांची तक्रार केली असता त्यांची तक्रार नोंदवण्यास दिरंगाई करून आरोपींची चौकशी न करता आरोपी मोकाट असून त्यांच्यापासून आमच्या परिवाराला धोका असल्यामुळे त्यांची तक्रार पोलीस अधिक्षक अलिबाग, उपविभागीय पोलीस अधिकारी, खालापूर, खालापूर तहसिल कार्यालय, पोलीस निरीक्षक, खालापूर, गटविकास अधिकारी खालापूर यांना दिली असून आम्हाला न्याय मिळावा याकरिता आम्ही २३ जून रोजी खालापूर तहसिल कार्यालय येथे आमरण उपोषण करत असल्याचे सम्राट मराठी चॅनलच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केले.