• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

श्री धापया महाराज देवस्थान उत्सव व होणाऱ्या कुस्त्या कोरोना विषाणू महामारीमुळे रद्द !


कर्जत (भिसेगाव) : सुभाष सोनावणे

कर्जतचे ग्रामदैवत श्री धापया महाराज देवस्थान उत्सव अक्षय तृतीयाच्या शुभ दिनी दरवर्षी होत असतो तर दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या कानाकोप-यातुन येणाऱ्या पैलवांनांमुळे कुस्त्यांचा सामना चितपट होताना बघण्यास कुस्ती शौकीन सकाळ पासूनच गर्दी करून रहात असत , मात्र आजपर्यंतच्या इतिहासात प्रथमच हा उत्सव व कुस्त्या कोरोना विषाणू संसर्ग महामारीमुळे रद्द करण्यात आल्या .

श्री धापया महाराज देवस्थानचा उत्सव दरवर्षी मोठया उत्साहात साजरा केला जातो .यावर्षी पहाटे पाच वाजताच अक्षय तृतीयाच्या दिनी लघुरुद्र करून श्री धापया महाराज देवस्थानची पूजा अर्चा करण्यात आली . मात्र कोरोना विषाणू महामारीमुळे संध्याकाळची संपूर्ण कर्जत शहरात वाजत - गाजत फिरणारी पालखी रद्द करण्यात आली , तर दिवसभर देवस्थान परिसरात दर्शन घेण्यास भाविकांची रांग असायची , कुणाचे नवस फेडण्याची रिघ असायची तसेच येथे जत्रेचे स्वरूप असायचे . मिठाई , खेळणी दुकानवाले दिवसभर बसायचे . हे सर्व यावेळी पाहण्यास दिसले नाहीत .

दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून तसेच मुंबई , पुणे , सोलापूर , कोल्हापूर , नवी मुंबई , नाशिक , सांगली , सातारा , तसेच कर्जत तालुक्यातील छोटे - मोठे पैलवान सकाळपासून चालणाऱ्या कुस्तीसाठी हजेरी लावून कुस्ती जिंकून श्री धापया महाराज देवस्थानला आखाड्यातील लाल माती उधळून जयघोष करीत सलामी देत असत . देवस्थान कमिटी अखेरच्या कुस्तीपर्यंत सर्वांना न्याय देत हा उत्सव

आजपर्यंत चालू आहे .कुस्तीचा हा वारसा स्वर्गीय रमेश चंदन पाटील , हसन शेख , मामा शेलार , यांनी चालू केलेला आजही कुस्ती शौकिनांना पाहण्यास मिळत आहे . मात्र यावर्षी कोरोना महामारीमुळे आजपर्यंतच्या इतिहासात कधीच रद्द न होणारा हा कर्जतचे ग्रामदैवत श्री धापया महाराज देवस्थान उत्सव यावर्षी रद्द करण्यात आला . त्यामुळे दर्शन घेणारे भाविक , नवस फेडणारे , तर कुस्ती खेळणारे पैलवान यांचाही हिरमोड झालेला दिसत आहे .