• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

वावोशी विभागातील शेतकरी पिककर्जाच्या प्रतिक्षेत - बँकेकडून पीककर्ज केव्हा मिळणार?

वावोशी विभागातील शेतकरी पिककर्जाच्या प्रतिक्षेत, बँकेकडून पीककर्ज केव्हा मिळणार, लॉकडाऊनमध्ये मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांचा सवाल?

वावोशी : जतिन मोरे

खालापूर तालुक्यातील छत्तीशी विभागातील नियमितपणे पीककर्ज भरणारे शेतकरी या वर्षीच्या खरीप पिकाचे उत्पादन घ्यावयाचे असून त्याकरिता दोन महिन्यांपासून पिककर्जाच्या प्रतीक्षेत आहेत. परंतू कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पीककर्ज मिळण्यास विलंब लागत असल्याचे बँकेचे अधिकारी सांगत आहेत. अशातच पावसाळा तोंडावर आल्याने शेतीची पूर्वमशागतीची कामे तशीच पडून राहिल्याने शेतकरी मात्र चिंतेत पडले आहेत.

राज्य शासनाने थकीत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेमार्फत लाखाची कर्जमुक्ती देण्यात आली. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २४ मार्च रोजी शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना जून महिन्यापर्यंत मुदतही दिली परंतू शेतकऱ्यांनी मुदतीच्या आत कर्ज फेडून देखिल रायगड मध्यवर्ती सहकारी बँकेकडून शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप केलेले नाही. त्यामुळे जवळ असलेला पैसा पिककर्जाच्या स्वरूपात भरून टाकल्याने लॉकडाऊनमधील कालावधीत शेतकऱ्याजवळ पैसा शिल्लक न राहिल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. त्यामुळे पीककर्ज वेळेवर न मिळाल्यामुळे शेतकरी चिंतेत पडले आहेत. आधीच लॉकडाऊनमध्ये मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्याची कंबर वाकलेली असताना पावसाळा तोंडावर आला असून शेतीची बांधबंदिस्ती, राब भरणे, बी-बियाणे, खते, शेतीची अवजारे खरेदी करणे अशी शेतीची पूर्वमशागतीची बरीच कामे करावयाची असून जवळ पैसा शिल्लक न राहिल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे प्रशासनाने यामध्ये प्रामुख्याने लक्ष देऊन पावसाळ्यापूर्वीच शेतकऱ्यांना खरीप पिकांचे उत्पादन घेण्यासाठी त्वरित पिककर्जाचे वाटप करण्यात यावे आणि शेतकऱ्यांवरील आलेले हे संकट दूर करावे अशी शेतकरी बांधवांकडून विनंतीपूर्वक मागणी केली जात आहे.