• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

वावोशी परिसरातील परप्रांतीय कामगार परतीच्या वाटेवर, वैद्यकीय दाखल्यासाठी धडपड सुरु


वावोशी : जतीन मोरे

देशभरातील विविध राज्यातील ठिकाणी अडकून पडलेल्या कामगार, मजूर, विद्यार्थी, तीर्थयात्रेला गेलेले यात्रेकरू यांना आपल्या घरी जाण्यासाठी प्रवास करण्याची परवानगी देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला असून परप्रांतीयांचा आपल्या घरी जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतू प्रवास करण्याआधी कोरोनाची वैद्यकीय चाचणी करणे अनिवार्य आहे. त्या अनुषंगाने छत्तीशी विभागातील कंपन्यांमधिल परप्रांतीय कामगारांची वैद्यकीय दाखल्यासाठी वावोशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या दोन दिवसांपासून लगबग सुरु असलेली पाहायला मिळत आहे.

छत्तीशी विभागात उत्तम स्टील, गोदरेज, पारले बिस्कीट, उत्तम फ्लोअर मिल, इटीजी ऍग्रो, हुतमाकी प्रा. लि, नॅशनल, क्रिमिका असे छोटे मोठे औद्योगिक कारखाने असून यामध्ये बराचसा कामगार वर्ग हा परप्रांतीय आहे. लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक आस्थापनेतील कंपन्या वगळता बाकी सर्व कंपन्या बंद झाल्याने या कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे तर एकीकडे कोरोनाच्या संसर्गाची भीती यामुळे या परप्रांतीयांनी आपल्या गावाकडे जाण्याची तयारी सुरू केली आहे. पण यासाठी वैद्यकीय दाखल्याची आवश्यकता असल्याने हा दाखला काढण्यासाठी परप्रांतीयांच्या वावोशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाहेर लांब रांगा पाहायला मिळत होत्या. यासाठी शासनाने परप्रांतीयांना उत्तर प्रदेश, बिहार, आसाम या राज्यात जाण्यासाठी मुंबई येथून विशेष ट्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतू याकरिता कोविड १९ ची तपासणी अनिवार्य केली आहे.