• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

वावोशी गावात पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याचा तीन जणांना चावा, वृद्ध महिला गंभीर जखमी


वावोशी : जतिन मोरे

वावोशी गावात एका पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने दोन लहान मुले आणि एका वृध्द महिलेवर अचानक हल्ला चढवत चावा घेतला, या हल्ल्यात अनुसया धारवे या वृद्ध महिलेच्या उजव्या डोळ्याच्या वरील भागात कुत्र्याने चावा घेतल्याने गंभीर दुखापत झाल्याने त्यांना ग्रामस्थांनी ताबडतोब प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. हा कुत्रा एवढ्यावरच न थांबता त्याने ७ वर्षाच्या लहान मुलीच्या पायाला चावा घेवून त्याने त्याचा मोर्चा गोरठण बुद्रुककडे वळवत तेथीलही एका लहान मुलाच्याही पायाला चावला या मुलांना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून सोडण्यात आले.

वावोशी गावात राहणाऱ्या अनुसया धारवे या घराबाहेर बसल्या असताना अचानक या पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला केला. कुत्र्याने केलेला हा हल्ला इतका जबरदस्त होता की त्याने तिच्या उजव्या डोळ्याची भुवई आणि कपाळाच्या भागाचा लचकाच ओढून काढला असून तिच्या नाकावर आणि ओठांवरही नख्यांनी ओरबडल्याने तिच्या चेहऱ्यावर रक्तस्त्राव वाहत होता. त्यामुळे ग्रामस्थांनी धाव घेत तातडीने वावोशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. परंतू आजीची जखम ही नाजूक ठिकाणी असल्याने तिच्यावर पुढील उपचार करण्यासाठी तिला पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करावे लागेल असे डॉ. सिमा पाईकराव यांनी सांगितले. पण एमजीएम रुग्णालयातील डॉक्टरांनीही त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथील केईएम रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. तरी सदरहू प्रकार पुन्हा घडू नये याकरिता ग्रामपंचायत प्रशासनाने याची दखल घेऊन भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांची व्यवस्था करण्यात यावी अशी प्रतिक्रिया संतप्त ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.