• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

वावोशी गावचे पहिले सरपंच उद्धवजी टिळक यांचे निधन


वावोशी : जतीन मोरे

खालापूर तालुक्यातील दहागाव छत्तीशी विभागातील एके काळी गजबजलेल्या बाजारपेठेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या वावोशी गावचे पहिले सरपंच, उत्कृष्ट व्यावसायिक, उत्तम शेतकरी असलेले उद्धव टिळक यांचे १५ एप्रिल रोजी वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांच्या राहत्या घरी वावोशी येथे निधन झाले. १९५६ मध्ये स्थापन झालेल्या वावोशी ग्रुपग्रामपंचायतीचे ते पहिले सरपंच होते. सध्याच्या विभक्त ग्रामपंचायत असलेल्या होराळे, परखंदे, शिरवली, गोरठण, जांभिवली या गावांची मिळून झालेल्या ग्रुपग्रामपंचायतीचे उद्धव टिळक हे पहिले बिनविरोध सरपंच म्हणून सर्वानुमते निवडून देेण्यात आलेे होते.

उद्धव टिळक हे उत्तम व्यावसायिक जरी असले तरी त्यांची नाळ ही शेतकऱ्यांशी जोडली होती. म्हणून त्यांनी छत्तीशी विभागातील शेतकऱ्यांची त्या काळी भाताचे वैरण करण्याकरिता पेण किंवा खोपोली सारख्या ठिकाणी होणारी कष्टप्राय आणि वेळखाऊ पायपीट थांबावी याकरिता वावोशी येथे पहिली भातगिरण तसेच तेलाचे घाणे आणि मसाल्याची चक्की त्यांनी सुरू केली. त्यांचा मुलगा रविंद्र टिळक यांनीही पुण्यातील बँकेची नोकरी सोडून आपले मन घरच्या शेती आणि व्यवसायाकडे वळवले. रवींद्र टिळक हे देखील आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांनी शेतीमध्ये लक्ष घालत वावोशी फाटा येथे स्वतःच्या मालकीचा नेरू निर्मितीचा कारखाना काढून ते उत्तम उद्योजक म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. उद्धव टिळकांचे सामाजिक क्षेत्रातही तितकेच चांगले योगदान लाभले आहे. टिळक हे पांढरपेशा वर्गातील असले तरी त्यांच्यावर पुरोगामी विचारांचा प्रभाव होता आणि त्यांनी तो आपल्या कार्यशैलीतून जपला. त्यांचे सर्व जातीधर्माच्या लोकांशी आपुलकीचे नाते होते. सर्व सामाजिक सण उत्सवांमध्ये त्यांचा महत्त्वाचा सहभाग असायचा. लॉकडाऊनच्या काळात त्यांचे निधन झाल्याने त्यांचे आप्तेष्ट आणि नातेवाईक मंडळींना त्यांचे अंत्यदर्शन मात्र घेता आले नाही. टिळक हयात जरी नसले तरी त्यांनी केलेले सामाजिक कार्य मात्र नेहमीच स्मरणात राहील. त्यांच्या पश्चात त्यांना तीन मुली आणि एक मुलगा असा परिवार असून त्यांचे उर्वरित संस्कारविधी हे लॉकडाऊन नंतर करण्याचे योजिले आहे.

29 views0 comments