• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

रसायनीमध्ये लॉकडाउनचे तीन-तेरा


रसायनी : प्रतिक चाळके

कोरोना विषाणू (कोव्हीड-१९) या रोगाने राज्यात थैमान घातला असून नागरिकांच्या सुरक्षेतेसाठी सरकार आणि प्रशासन हे कोरोना विषाणूच्या लढ्याला दोन हात करत असून कोरोना रोगाला सामोरे जात आहेत. सरकारने रायगड जिल्ह्याला " ऑरेंज झोन" घोषित केला आहे. परंतु रायगड जिल्ह्यातील पनवेल महापालिकेमध्ये कोरोना रुग्णाची संख्या ही वाढत असून तसेच पनवेल हे मुंबईचे प्रवेशद्वार असल्याने पनवेल महापालिका रेड झोन मध्ये दिसत आहे.

पनवेल पासून रसायनी परिसर हा १४-१५ किलोमीटर अंतरावर असून रसायनी परिसरातील काही भाजी विक्रेते हे पनवेलला भाजी आणण्यासाठी जात असून खरेदी करतात आणि तीच भाजी रसायनी बाजारपेठेमध्ये विकली जाते. रायगड जिल्हा "ऑरेंज झोन" झाल्यावर रसायनीमध्ये सोमवारी ४ मे रोजी नागरिकांनी भाजी मार्केट साठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून सरकारने १७ मे पर्यंत केलेल्या लॉकडाउनचे तीनतेरा वाजवलेले दिसत होते. पोलीस प्रशासन स्पीकर द्वारे नागरिकांना ओरडून सांगत होते की गर्दी करू नका, सोशल डिस्टन्सचा नियम पाळा, कोरोना विषाणू अजून संपलेला नाही. तरीही रसायनीतील नागरिक या सूचनांकडे दुर्लक्ष करून सोमवारी सकाळी बाजारपेठेमध्ये फिरत असल्याचे निदर्शनास आले.

जर रसायनी परिसरात अशीच गर्दी राहिली तर कोरोना विषाणू रसायनी परिसरात येण्यास वेळ लागणार नाही. तरी रसायनीतील संबंधित अधिकारी तसेच ग्रामपंचायत या बाबींकडे लक्ष देवून परिसर कोरोनाच्या अडचणीत येण्यापासून रोखावे अशी जागरूक नागरिकांद्वारे माहिती कळविण्यात येत आहे.