- हक्कासाठी आंदोलन
महापालिका हद्दीतील नवीन पनवेल, खांदा कॉलनी तर ग्रामीण भागातील भिंगारवाडी येथील कोरोना बाधित रुग्ण
महापालिका हद्दीतील नवीन पनवेल, खांदा कॉलनी तर ग्रामीण भागातील भिंगारवाडी येथील कोरोना बाधित रुग्ण

प्रतिनिधी : पनवेल
पनवेल तालुक्यात शुक्रवार, २४ एप्रिल रोजी आणखी तीन नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली असून यामध्ये महापालिका हद्दीतील नवीन पनवेल व खांदा कॉलनी येथील तर ग्रामीण भागातील भिंगारवाडी येथील कोरोना विषाणूचे रूग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत महापालिका हद्दीत ४४ पैकी १५ तर पनवेल ग्रामीणमधील ८ पैकी ५ रूग्ण पुर्णपणे बरे झालेले आहेत.
शुक्रवार, २४ एप्रिल रोजी ३ नवीन नोंद झाले असून पनवेल तालुक्यातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या ५३ वर पोहोचली आहे. आज आढळलेला नविन पनवेल येथील ५१ वर्षीय रूग्ण मुंबई महापालिकेत सफाई कामगार म्हणून कार्यरत आहे. सदर कामाच्या ठिकाणीच त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय खांदा कॉलनीमधील एक महिला डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या असून त्या बॉम्बे पोर्ट ट्रस्ट, मुंबई येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे. तसेच भिंगारवाडी येथील एका ६१ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असून हा रूग्ण खांदा कॉलनी येथील अष्टविनायक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना संसर्ग झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या व्यक्तीच्या संपर्कातील तीघांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली असल्याची माहिती पनवेल प्रांताधिकारी दत्तात्रेय नवले यांनी दिली आहे.
पनवेल तालुक्यात ५३ कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली आहे. परंतु वर्गवारी केल्यास बहुतांश रूग्ण हे पनवेल तालुक्याबाहेर निरनिराळया अत्यावश्यक सेवा देणारे असल्याने त्यामध्ये सीआयएफएस जवान, डॉक्टर, परिचारीका त्याचबरोबर लॅब टेक्निशियन, असल्याचे आढळून आले आहे. याशिवाय या कोरोनाबाधित रूग्णांमध्ये परदेशवारी करून आलेल्यांचाही समावेश आहे.