• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

बेजबाबदार अधिकाऱ्यांमुळेच कर्जतमध्ये होम क्वारंटाईनचा फज्जा !


कर्जत (भिसेगाव) : सुभाष सोनावणे

राज्यात कोरोना विषाणू संसर्ग महामारीच्या विरोधात चौथा टप्पा चालू आहे . या टप्प्यात अनेक नियम शिथिल केले असल्याने एका जागी थांबलेले नागरिक आपल्या घराकडे रवाना झालेले आहेत. मात्र हे नागरिक आपल्या परिसरात पोहचल्यावर संबधित अधिकारी वर्गांची यंत्रणा बेजबाबदारपणे काम करत असल्याने शासनाने आखून दिलेल्या नियमात बाहेरून आलेला नागरिक होम क्वारंटाईन मध्ये रहातो कि नाही , यावर कंट्रोल नसल्याने होम क्वारंटाईनचा चांगलाच फज्जा कर्जतमध्ये उडाला असून बेजबाबदार अधिका-यांच्या सुस्ताडलेल्या यंत्रणेमुळेच कर्जतमध्ये भविष्यात कोरोना बाधित रुग्णांची साखळी तयार होण्याची भीती अनेक नागरिक चर्चेतून व्यक्त करत आहेत .

एकाच ठिकाणी अडकलेले अनेक नागरिक शासनाच्या चौथ्या टप्प्यात कर्जतमध्ये आपापल्या घरी पोहचले आहेत . मात्र ते परिसरात पोहचल्यावर त्यांना घरी जाऊ न देता शासनाने क्वारंटाईन केंद्र स्थापन करून त्यात ठेवणे गरजेचे होते . शिवाय असे नागरिक परिसरात आल्यावर होम क्वारंटाईन चे नियम पाळतो कि नाही , यावर कुणाचेच अंकुश नसल्याने बाहेरून आलेली ती व्यक्ती १४ दिवसा पूर्वीच घराबाहेर पडून यथेच्छ फिरण्याची मजा घेतात , याबाबतीत संबंधित अधिका-यांना तक्रारी करूनही कुणीच मनावर घेत नसून मा . जिल्हाधिकारी यांचे आदेश कोरोना कंट्रोल अधिकारी व त्यांची यंत्रणा पायदळी तुडवीत आहे .

कर्जत दहिवली येथील संजयनगर परिसरात सापडलेला रुग्ण हे त्याचेच एक उदाहरण असून इतरही परिसरात बाहेरून आलेले नागरिक " सध्या तो काय करतोय " याची तुसभर देखील खबर या होम क्वारंटाईम यंत्रणेत काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचा-यांना माहीत नसल्याचे चित्र येथे दिसत आहे .या यंत्रणेत कर्जत नगर परिषद , कर्जत तहसील कार्यालय , प्रांत अधिकारी कार्यालय याचे अधिकारी व कर्मचारी असून हि यंत्रणा अशीच काम करत राहीली तर सपशेल फेल होऊन कोरोना बाधित रुग्णांची साखळी कर्जतमध्ये तयार होण्यास वेळ लागणार नाही . हत्ती गेलं , आणि शेपूट राहिलं , असाच आताचा कोरोनाचा कालावधी असल्याने सतर्कता - सावधानता - सुरक्षितता बाळगणे गरजेचे झाले आहे . अन्यथा आतापर्यंत कोरोना विरोधात केलेली लढाई फुकट जाणार , यात शंकाच नसेल , अशी माहिती कर्मचारी , लोकप्रतिनिधी , व नागरिकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे .