• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

निसर्ग चक्रीवादळाचा वावोशी विभागातील गावांना फटका, आपत्तीग्रस्तांची शासनाकडे नुकसानभरपाईची मागणी

निसर्ग चक्रीवादळाचा वावोशी विभागातील गावांना फटका, घर, दुकाने यांचे मोठे नुकसान,आपत्तीग्रस्तांची शासनाकडे नुकसानभरपाईची मागणी

वावोशी : जतिन मोरे

निसर्ग चक्रीवादळाने वावोशी येथील दांडवाडी, बुरमाटवडी, फणसवाडी, भिमनगर, मल्हार नगर, गोरठण,वावोशी फाटा, वावोशी गाव या वाड्यांना जोरदार तडाखा दिला असून येथील घरांचे पत्रे, कौले, छप्पर उडाले असून काही घरांच्या भिंती कोसळल्या तर काही घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत. या झालेल्या चक्रीवादळात जीवितहानी झाली नसली तरी वित्तहानी फार मोठ्या प्रमाणात झाली असून येथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

३ जूनला आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने खालापूर तालुक्यातील वावोशी विभागांतीलगावांना जबरदस्त तडाखा दिला असून या वादळात वावोशी येथील डोंगराळ भागातील दांडवाडी, बुरमाटवाडी या आदिवासी वाड्यांमधील १२ घरांची मोडतोड झाली असून पावसाच्या पाण्याने घरातील अन्नधान्य भिजून गेल्याने या आदिवासी बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच बेघर झालेल्या आदिवासी बांधवांची प्राथमिक शाळा आणि अंगणवाडीत राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तर मल्हार नगर, भिमनगर, वावोशी गाव, गोरठण, वावोशी फाटा येथील काही घरांना तडे गेले असून काही घरांचे आणि दुकानांचे शेड उडून गेल्याने फार मोठे नुकसान झाले आहे. तसेच वावोशी गावातील स्मशानभूमीचे निवारा शेड आणि अंगणवाडीचे छप्पर उडून गेले असून राममंदिरासमोरील रंगमंचावर झाड कोसळल्याने रंगमंचही मोडून गेला आहे. या चक्री वादळामध्ये विजवितरणचे खांब उन्मळून पडल्याने संपूर्ण विजयंत्रणाही कोलमडली असून ती पूर्ववत करण्याचे काम सुरु आहे. तरी या चक्रीवादळात नुकसान झालेल्या लोकांना त्वरीत नुकसानभरपाई मिळावी अशी येथील लोकांची मागणी असून सदर परिस्थितीची पाहणी आणि पंचनामे वावोशी आणि गोरठण ग्रामपंचायतीचे सरपंच प्रभाकर छत्तीसकर, महेश पाटील, ग्रामसेवक गणेश मोरे, आर वाय श्रीखंडे यांनी केली असून नुकसान झालेल्या व्यक्तींची माहिती शासनाकडे पाठवण्यात आली आहे.

27 views0 comments
™© Copyright - dont copy this text™