• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

निसर्ग चक्रीवादळाची दिशा आणि वेग imd कडून जाहीर..


आंदोलन : प्रतिनिधी

आज बुधवारी रायगड जिल्ह्यातील अलिबागजवळ निसर्ग चक्रीवादळ धडक देण्याची शक्यता आहे. 1961 नंतर महाराष्ट्र समुद्र किनाऱ्यावर धडकणारे हे पहिले चक्रीवादळ असणार आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, हे चक्रीवादळ अरबी समुद्रामध्ये उत्तर-ईशान्य दिशेने सरकत आहे आणि पुढे उत्तर महाराष्ट्र व त्यास लागून दक्षिण गुजरात किनारपट्टी ओलांडेल. असे हवामान खात्याने यावेळी सांगितले.

आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, निसर्ग चक्रीवादळ लवकरच रौद्र रूप धारण करेल व त्याचे स्वरूप अजून वाढेल. आज बुधवार दुपारी, हे वादळ महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील अलिबागजवळ, महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीवरील हरिहरेश्वर ते दमण दरम्यान पुढे सरकेल. हे चक्रीवादळ दोन राज्यांत जास्तीत जास्त 100-110 किमी ते 120 प्रतितास वाऱ्याच्या वेगाने धडकणार आहे. हे वादळ सध्या पणजीच्या पश्चिम-वायव्येस सुमारे 280 कि.मी वर, मुंबईच्या दक्षिण-नैऋत्येस 350 कि.मीवर, अलिबागच्या दक्षिण-नैऋत्येस 300 कि.मी. आणि सुरतच्या दक्षिण-नैऋत्येकडे 560 किमी. अंतरावर आहे.

या चक्रीवादळामुळे रायगड, मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. वादळाची परिस्थिती पाहता, येत्या 48 तासांसाठी राज्यातील जनतेने घरातच राहण्याचे आवाहन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी केले. मुसळधार पावसामुळे महाराष्ट्राच्या काही भागात वीज पुरवठाही खंडित होऊ शकतो, असेही ठाकरे म्हणाले. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या किनारपट्टी भागात कलम 144 लागू करण्यात आला आहे आणि किनारपट्टी परिसरात नागरिकांना जाण्यास मनाई केली आहे. ( 'निसर्ग 'चक्रीवादळाच्या पार्श्वभुमीवर पालघर येथील समुद्र किनापरट्टीलगतच्या 13 गावांमधील नागरिकांना NDRF कडून हलवण्यात येणार)

या वादळाच्या संभाव्य धोक्याला लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारतर्फे सर्व प्रकारची तयारी करण्यात आली आहे. नागरिकांना याबाबत सतर्क करण्यापासून ते अधिक धोका असणाऱ्या भागात एनडीआरएफच्या (NDRF) तुकड्या सज्ज ठेवण्यापर्यंत सर्व प्रकारची खबरदारी घेण्यात आली आहे. लष्कर, हवाई दल, नौदल, भारतीय हवामान विभाग यांना समन्वय ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.