• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

निसर्ग चक्रीवादळाची तातडीची मदत अद्यापी मिळाली नसल्याने अनेक कुटुंब ऐन पावसात उघड्यावर !कर्जत (भिसेगाव) : सुभाष सोनावणे -

तो आला , घूम घूम फिरला , सोसाट्याने आला पण जाताना अनेकांची घरे - संसारे उध्वस्त करून गेला. कोरोना विषाणूने अगोदरच अर्धमेले झालेले नागरिक ह्या निसर्ग चक्रीवादळाने " कट्यार काळजात घुसावी " तशी तडफडत राहिली व आपल्या शिरावरचे छप्पर उडताना फक्त बघतच राहिली . ऐन पावसात आपले कुटुंब उघड्यावर आल्याने मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या या मदतगारांना शासन - प्रशासन तातडीची मदत देते कि नेहमी सारखी हातावर तुरी देते , अशी चर्चा सध्या कर्जतमध्ये घुमत आहे .

२ जून च्या मध्यरात्री पासून ते ३ तारखेपर्यंत उठलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा फटका कर्जत तालुक्यातील शहारांबरोबरच ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात नागरिकांना बसला . कोरोनामुळे पै - पै ला मोहताज झालेल्या नागरिकांच्या घरावरचे छप्परच घेऊन गेलेल्या या वादळामुळे ऐन पावसात अनेक कुटुंब उघड्यावर आली . या कुटुंबांना शासन - प्रशासनाकडून तातडीच्या मदतीची गरजच या पावसात कावळ्याच्या घराप्रमाणे काडीसारखी उपयोगात येणारी असताना आज आठ दिवस होऊनही शासनाच्या मदतीचा अद्यापी पत्ताच नसल्याने ऐन पावसात घरावर छप्पर टाकताना कुटुंब प्रमुखावर कमालीचे दडपण येत असून गाठीला पैसे नसताना छप्परासाठी कोठून पैसे आणू , या विवंचनेत चक्रीवादळाने उध्वस्त झालेल्या व कोरोना विषाणू महामारीच्या कैचीत अडकलेल्या अनेक कुटुंबाची अवस्था सहनही होत नाही , आणि सांगताही येत नाही अशी झाली आहे .

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. उद्धव साहेब ठाकरे यांनी रायगडला भेट देऊन तातडीची शंभर कोटींची मदत जाहीर केलेली असताना उध्वस्त घरांचे पंचनामे होऊनही अद्यापी मदत का मिळाली नाही , अशी ओरड आत्ता नागरिक करत आहेत . घरांची कौले , ढापे , पत्रे , लाकडे , लोखंडी शेड , तुटलेल्या भिंती , पूर्वीसारखे करायला सरकारी बाबू बुझगावण्यासारखे स्तब्ध झालेत का , म्हणूनच मदत खात्यात जमा होत नसल्याची बतावणी होत असून प्रशासनाने लवकरच आपल्या कामातील नपुंसकता घालवून ऐन पाऊस रंगात येण्याच्या अगोदर तातडीची मदत उध्वस्त झालेल्या कुटुंबाना द्यावी , अशी मागणी कर्जतमध्ये होत आहे . पण म्हणतात ना , सरकारी काम आणि सहा महिने थांब , हे ब्रीद वाक्य कोणी खोडु शकत नाही , हेच त्रिवार सत्य म्हणावे लागेल . मात्र नागरिकांत आता संतापाचे वारे वाहू लागलेले दिसून येत असून स्थानिक आमदार - खासदार - पालकमंत्री यांनी तातडीने लक्ष देऊन मदत पदरात पाडा , अशी मागणी जोर धरू लागली आहे .