• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

धंदे में कौन किसी का नही होता, बाजारपेठेत वाढीव दराने कर्जतकरांची लूट !


कर्जत (भिसेगाव) : सुभाष सोनावणे

कोरोना विषाणूने सर्वत्र हाहाकार माजवला असताना सर्वच व्यवहार स्तब्ध झाले आहेत. गोरगरीब नागरिक पैशाअभावी जीवन जगत आहेत. उधारी - पाधारी करत, कुणाकडून उसनवारी, व्याजी पैसे आणून आपले कुटुंब चालवत आहेत. बाजारपेठेत मात्र आताच्या महामारीच्या काळात कुणीही - कुणावर दया - माया दाखवताना दिसत नाहीत. जीवनावश्यक तसेच नागरिकांच्या खाण्याच्या वस्तूंचे दर मनाला वाटेल तसे दुकानदार घेत असून चाललेल्या लुटीकडे संबंधित अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने अश्या चढ्या भावाने वस्तू विकणाऱ्या दुकानदार - व्यापा-यांवर जिल्हाधिकारी रायगड यांच्या आदेशान्वये कारवाई करण्याची मागणी होत आहे. तर धंदे में कौन किसी का नही होता , असेच काहीसे चित्र कर्जत बाजारपेठेत पहाण्यास मिळत आहे .

कर्जतच्या बाजारपेठेत अनेक वस्तूंच्या दरात दुकानदार वाढ करून विकत आहेत . कोरोना विषाणू च्या काळात गोरगरिबांची आर्थिक स्थिती खूपच नाजूक आहे , त्यात पोट भरण्यासाठी ज्या वस्तू लागतात त्या घेणे गरजेचेच असल्याने वाढीव दाम देऊन वस्तू घ्याव्या लागतात . आपला नफा कसा होईल , एव्हडेच लक्ष दुकानदार ठेवत आहे . एके काळी शंभराला चार जिवंत कोंबडी मिळणारे चिकन आता २४० रु . किलोने विकले जात आहे . तर मटण देखील ६४० रु . किलोने देण्यात येत आहे, त्याचप्रमाणे मच्छी, अंडी ,सुकी मच्छी, देखील बेभरोसे भावात विकले जात आहे. तर किराणा सामानातील वस्तूंचे देखील दर वाढलेले दिसून येत आहेत, भाज्यांचे दर देखील वाढले आहेत, मसाला बनवायला मिरची हि गरजेची असल्याने ती हि चढ्या भावाने विकली गेली. यावर संबंधित अधिकारी वर्गांनी वेळीच पावले उचलून तातडीने दुकानदार व व्यापारी यांच्यावर कारवाई करावी. अशी मागणी नागरीकांमधून होत असून धंदे में कौन किसी का नही होता. हेच यावरून दिसून येत आहे .