- हक्कासाठी आंदोलन
दहागाव छत्तीशी विभागात अवकाळी वादळी पावसाचा हा..हा..कार
दहागाव छत्तीशी विभागात अवकाळी वादळी पावसाचा हाहाकार, घरांच्या भिंती, पत्रे, विजेचे खांब कोसळले, शेतीचेही मोठे नुकसान

वावोशी : जतिन मोरे
खालापूर तालुक्यातील दहागाव छत्तीशी विभागात अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावल्याने या भागातील खानाव,भोकरपाडा, खडई ठाकूरवाडी, चिलठण, गोहे, करंबेली, गोठीवली, नारंगी, खरीवली या गावांचे फार मोठे नुकसान झाले आहे. या अवकाळी वादळी पावसाने जीवितहानी मात्र झाली नाही परंतू गावातील घरांच्या भिंती कोसळून घराची कौले आणि पत्रे उडून गेल्याने लोकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
आधीच कोरोनाच्या संकटात असलेल्या लोकांना अचानक आलेल्या या अवकाळी पावसाने दिलेल्या तडाख्यामुळे मोठा धक्का बसला असून फार मोठे नुकसान झाले असून या लोकांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी म्हणून त्वरित पंचनामे करण्यात यावे अशी मागणी होत आहे. तसेच या वादळी पावसामुळे आधीच कर्जमाफीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांचेही फार मोठे नुकसान झाले आहे. उन्हाळी भात शेती, आंब्याच्या बागा आणि भाज्यांचे मळे करणाऱ्या शेतकऱ्यांनाही या अवकाळी वादळी पावसाचा फटका बसला असून शासनाकडून त्वरित नुकसानभरपाई मिळावी अशी शेतकऱ्यांकडून मागणी केली जात आहे.

या वादळी वाऱ्याचा फटका विजवितरण कंपनीलाही मोठया प्रमाणात बसला असून यामध्ये वावोशी फाटा, वावोशी दांडवाडी, होराळे, आपटी, डोणवत, खरीवली, गोठीवली ते पाली फाटा,उंबरे पर्यंत विजेचे खांब उन्मळून पडले आहेत. विजवीतरणचे सहाय्यक अभियंता अविनाश कोकिटकर यांच्याशी संवाद साधला असता विजवितरण व्यवस्था पुर्ववत होण्यासाठी मनुष्यबळ कमी असल्याने जास्तीत जास्त ४ दिवसांचा कालावधी लागेल असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. तरीही या अवकाळी पावसामुळे लोकांची झालेली नुकसानभरपाई लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी ग्रामस्थांकडून मागणी होत असून त्यासाठी शासन कोणती पाऊले उचलतोय हे पाहावे लागेल.