• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

जेष्ठ साहित्यिक उत्तम बंडू तुपे कालवश

Updated: Apr 27, 2020


लेखक- संपत जाधव

मो. 9823317789

उत्तम बंडू तुपे आपल्यातुन देहाने आज गेले,परंतु "झुलवाकार, काट्यावरची पोटकार" या उपाध्या मागे ठेऊन गेले. आप्पा हे आदराचे नाव आपण कधीच विसरणार नाही. जगविख्यात मानवतावादी,सत्यशोधक साहित्यिक डॉ. अण्णा भाऊ साठे याचा वारसा चालविणारे, त्यांचा विचार घेऊन मानवतावाद साहित्यातून मांडणारे उत्तम बंडू तुपे हे खरे वारसदार ग्रामिण साहित्याचा रथ खांद्यावर घेऊन चालणारा, त्या प्रवाहाला प्रवाहित करणारा हा कर्मयोगी ग्रामीण साहित्याचा कणा म्हणलं तर वावग ठरू नये. "जगा वेगळा माणुस, आमच्या भेटी" म्हणजे चर्चेच्या तलवारीतुन उडणाऱ्या ठिणग्या.. रोख-ठोक स्वभाव आणि बाणेदार कृती हे त्याचे अलंकार होते. शिक्षणाची वाणच, तिसरी पर्यंतच बेताच शिक्षण, परंतु या (अडाणी शिक्षणाने) माणसाने मोठ्या-मोठ्या महापंडितांना शिक्षण देऊन शहाणं करून सोडलं. तो खरा ग्रामीण साहित्यातील निष्णात सर्जन होता. म्हणूनच साहित्यातील त्याच्या नायक-नायकाच्या आजाराचं अचूक निदान करून त्याच जीवन सुधारण्याचा मोलाचं काम केलं. उत्तम बंडू तुपे कसे होते? कोण होते? कसे जगले? या प्रश्नाचे गुढ कधी जगाला वाटलंच नाही. कारण १९८०-८२ च्या दरम्यान त्यांनी "काट्यावरची पोट" हे आत्मचरित्र लिहलं, ते खरेतर साहित्यातील त्याच पहिल पाऊल होत. त्यात त्यांनी वास्तववादी जीवनाचं चित्र रेखाटले; ते वाचताना लाखोंची हृदय पिळवटली, डोळ्यांच्या कडा ओलावल्या. परंतु ती हजारोंच्या प्रेरणा ठरली.महापंडित ही लाजले त्यांच्या शब्द सौंदर्याने आणि प्रतिभेने,माणसांची जगण्याची परिभाषा बदलली. उत्तम बंडू तुपे साहित्यातील दलित सवर्ण, ग्रामीण हे शब्दप्रणाली कधी आवडली नाही. साहित्य हे मनुष्य समूहाच्या तत्काळचा इतिहास असतो, संस्कृती असतें. म्हणुन ती आपण जतन केली पाहिजे.पुढे दलित साहित्याचा प्रवाह वेदना आणि विद्राह घेऊन आला. परंतु साहित्यातील ही वेदना तर आमच्या जीवनाची नादी आहे. आणि विद्राची तर मशाल आण्णा भाऊंनीच पेटवली. आणि तीच घेऊन मी साहित्यातील परिवर्तनाचा लढा लढत आहे. उत्तमं बंडू तुपेंच साहित्य हे वेदनांचा चांदण होतं, परंतु त्या वेदनाही सकारात्मकतेला सजवणार हा आवलीया. त्यानी त्याच्या नायक-नायकांना जगण्याची उमेद दिली आणि तो स्वतः ही त्या वेदनांचा अविभाज्य भाग असताना, त्याने ते जगणं कधीच नाकारलं नाही. उलट ते विद्रुप जगणं, लांच्छित जगण्याला ज्ञान विचाराच्या कोरड्याने झोडून काढले.आणि म्हणूनच ते आयुष्य जगतांना पौर्णिमेच्या चांदण्याचा स्वागत केलं. हा स्वाभिमानी माणूस त्याच्या नायक-नायिकाच्या सारखाच स्वाभिमानाने जगला आणि स्वाभिमानानेच आपल्यातुन निघून गेला. स्वाभिमान हा त्याच्या जीवनाचा सार होता.परंतु या स्वाभिमानालाच दूरवत अनेकांनी त्याना मुजोरा म्हटलं. परंतु त्याने त्याचा कधीही खेद ना खंत मानला.तोच स्वाभिमान त्यांच्या जीवनाची आणि साहित्याची प्रेरणा ठरली. त्या प्रेरणेतून त्यांचे जीवन आणि साहित्य जन्माला आले. "झुलवा" ही कादंबरी तर साहित्यातील मैलेज स्टोन ठरली. त्यातील जोगतीन,जगनी, परशा ही पात्र आपण पाहतो. परंतु तुपेंनी जगणीला, परशाला पाहिलं नाही, तर अनुभवलं ते जीवन त्याच्यात राहून जगले. त्यांचं जीवन पाहिलं अनुभवलं आणि त्या अमानवी जगण्याचं वास्तव जीवन रेखाटताना वरवरचा कॅमेरा न मारता,मनाच्या करुणेचा कॅमेरा मारून ते टिपलं.टाळ्या वाजवून पोटाची आग विझवणाऱ्या देवाची बायको परंतु जगाची ही भोगदासी, त्या टाळ्या वाजणाऱ्या हातात त्यांनी पाटी-पेन्सिल दिली. ज्ञान प्रकाशात आणून, जगणीला ज्ञानाचा तिसरा डोळा देऊन इथल्या दांभिक परंपरेचा निषेध, विद्रोह केलाच परंतु देवाचाच कडेलोट करून परंपरेच्या तुरूंगातून जगणीला मुक्त केले. अशीच त्यांची भस्म कादंबरी ...मसन जोगी जमात स्मशानातील राख चाळून त्यावर जगणारी जात; उत्तम बंडू तुपे ना ठावे होती. ती राख त्याच्याच आयुष्याची होती.त्या राखेतून कोणीही फिनिक्स पक्षी ऊंच भरारी मारून बाहेर पडणार नाही ती फक्त परीकथा आहे. त्या कथेला वास्तववादी बनवायचे असेल तर एकच मार्ग शिक्षण म्हणूनच ते भस्म कादंबरीत मसन जोग्या च्या मुला-मुलींना शिकलं पाहिजे असा आग्रह धरतात त्याच कादंबरी चा सन्मान झाला. त्यावर बेतलेला "भसम्या" सिनेमा मोठा मनाचा सन्मान देऊन गेला. "इजाळ" नावाची २० वर्षांपूर्वी ची कादंबरी, परंतु आजच्या शेतकऱ्यांच्या जगण्या-मारण्याचा वेध घेतला.त्यांच्या दुःख ला जगाच्या वेशीला टांगण्याचे मोलाचे काम केले त्यांची पत्नी ही अशिक्षित परंतु,बहिणाबाईची वारसदार असल्यासारखी स्त्री जीवनाचं यथार्थ चित्रण त्यांत त्यांनी मांडला. खरे तर त्या नेहमी म्हणायच्या ही प्रेरणा आप्पाची आहे. आप्पा म्हणजे उत्तम बंडू तुपे. "काट्यावरची पोट" झुलवा ही खरीतर त्यांच्याच नाहीतर मराठी इतिहासतील पांन. त्यांच्या समतावादी लेखणीने अशा कथा-कादंबऱ्या ना जन्मा घातले. त्यात झुलवा,इजाळ,नाकशारी, आंदण,कोब्रा, खाई, खुळी, चिपाड, झापल पिंड, भस्म, माती आणि माणस, लांबलेल्या सावल्या, शेवंती, संतू, अशा अनेक साहित्य कृतींना त्यांच्या मराठी सरस्वताचा साहित्य दरबार सजवला. उत्तम बंडू तुपे यांना अनेक राज्यस्तरीय राज्याचे आणि सर्वेच्च साहित्य अकादमी नेही त्यांना सन्मानित केलं. "सुरभी" नावाच्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात जी मुलाखत झाली ती मराठी माणसाचा पहिला सन्मान होता. तसेच नाशिक येथे पार पडलेल्या समरसता साहित्य मंचाच्या, साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. माझी तुपेंच्या घरी वारंवार ये जा असायची त्यावेळी त्याचं जीवन आर्थिक दृष्ट्या मेटाकुटीला आलेलं पाहिलं,अनेकांनी त्याची कल्पनाही दिली. अचानक अनेक चॅनल वर त्यांच्या वारधक्याच्या आणि आर्थिक स्थितीच्या बातम्या झळकल्या. त्यांच्या जगण्याच ते दुर्दैवी चित्रण पाहून मलातर कॅपिटल ग्रंथाद्वारे जगाला साम्यवाद सांगणाऱ्या मार्कस आठवला. त्याच्या जगण्याची अशीच शोकांतिका झाली होती. मग मात्र समाज शासन जाग झालं व त्यांना त्या उपेक्षित जीवनातून काढलं. खरेतर आनंद यादव, शंकर पाटील, द.मा.मिरासदार, ग.दि. मांडगुळकर, व्यंकटेश माडगूळकर, पु.ल. देशपांडे अशा महान साहित्याकांच्या माळेतला हा मनीं निरवळला. खंत एकच आहे ती अखिल भारतीय साहित्य संमेलन परिषदेला आणि जागतिक मराठी साहित्य परिषदेला कारण त्या महान अध्यक्षांच्या पंगतीत या महान साहित्यकाचे नाव व फोटो नसणार. उद्या ग्रामीण साहित्याचा इतिहास लिहला तर उत्तम बंडू तुपे शिवाय तो अधुरा असेल २०२१ च्या १ जानेवारी ला आता आप्पांच्या वाढदिवसाच्या नाही तर पुण्य स्मरणाची आठवण येईल. आप्पांना भावपुर्ण श्रध्दांजली ज्येष्ठ साहित्यिक उत्तम बंडू तुपे यांना हक्कासाठी आंदोलन तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐