• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

जून, जुलैमध्ये कोरोना सर्वाधिक धोकादायक असण्याची शक्यता; एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया


नवी दिल्ली : ७ मे: देशभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ५० हजारच्या पुढे गेली आहे. १७ मेपर्यंत देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मात्र लगेचच कोरोनाची रुग्ण संख्या कमी होणार नाही याबाबत वारंवार तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे जून, जुलै या महिन्यात कोरोनाचे सर्वाधिक धोकादायक असेल, असं वक्तव्य एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया (Randeep Guleria) यांनी केलं आहे.

एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया म्हणाले की, ''कोरोनाची सद्यस्थिती पाहता आपल्याला कोरोनासोबत जगावे लागणार आहे, तसेच जून महिन्यामध्ये भारतात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळतील,'' अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फायदा मिळाला आहे. लॉकडाऊनमुळे कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढलेले नाहीत, असेही त्यांनी सांगितले. लॉकडाऊन वाढत असल्याने लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. सर्व कामे कधी सुरू होणार याबाबत वारंवार विचारणा केली जात आहे. मात्र येत्या जून, जुलैमध्ये कोरोना रुग्णांची संख्या अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जून, जुलै हा कोरोनाचा पीक सिझन असेल असंही डॉ. गुलेरिया यावेळी म्हणाले. मात्र लोकांनी घाबरुन जाण्याची गरज नाही. देशात चाचण्या जास्त होत असल्याने रुग्णांची संख्या वाढत आहे. काही ठराविक भागांमधूनच कोरोनाचे जास्त रुग्ण आढळून येत आहेत. इतर ठिकाणी कोरोनाचा प्रभाव कमी झाला आहे. पाच महिन्यांनंतरही यावर लस (Covid 19 Vaccine) निर्माण होत होत नसल्याने शास्त्रज्ञ, एका नवीन निष्कर्षावर पोहचले आहेत. आता माणसांना या विषाणूसह जगण्याची सवय करुन घ्यावी लागेल असं संशोधकांकडून सांगण्यात आलं आहे. जगभरातील अनेक कंपन्या कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी अनेक ऍन्टी-फ्लू लसी तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, जवळपास ९०हून अधिक संस्था आणि कंपन्या कोरोना व्हायरसवर लस निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु, क्लिनिकल चाचण्या पूर्ण न केल्यामुळे, या लसींचे कोणतेही निकाल समोर आलेले नाहीत. यावर ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सचे (एम्स) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी, आता आपल्याला कोरोना व्हायरससोबत जगण्याची सवयच करावी लागेल, असं सांगितलंय. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक डॉक्टर आणि संशोधकांनी येणाऱ्या काळात कोरोनावरील लस तयार करण्यास अवधी लागू शकत असल्याचं सांगितलं. त्यामुळे कोरोना व्हायरसपासून स्वत:चा बचाव करणं हा त्यावरील एकमेव उपाय असल्याचं सांगण्यात आलं आहे.