• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

खालापूर पोलिसांची उत्तम कामगिरी.. सिलेंडर चोरी करणारी टोळी गजाआड


खालापूर : विशाल वाघमारे

7 मार्च रोजी झालेल्या घटनेची पुनरावृत्ती दिनांक 12 मार्च रोजी कॉन्फिडन्स गॅस सिलेंडर बनविणाऱ्या कंपनीत सिलेंडर चोरी झाल्याने पोलीस प्रशासन हादरले होते.

घटनेची सखोल माहिती घेतली असता रायगड जिल्ह्यातील खालापूर पोलीस ठाण्याच्या पौध गावाच्या हद्दीतील कॉन्फिडन्स गॅस सिलेंडर बनविणाऱ्या कंपनीच्या आवारात दिनांक 7 मार्च रोजी अज्ञात 4 ते 5 चोरांनी प्रवेश करत 5 सिलेंडर चोरी केल्याची नोंद खालापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. त्याचा तपास लागत नाही तोच पुन्हा दिनांक 12 मार्च रोजी त्याच घटनेची पुनरावृत्ती होऊन त्यादिवशी 119 सिलेंडर चोरी झाल्याने व चोरांनी कोणताही पुरावा न ठेवल्याने तसेच कंपनीत कोणताही सी.सी.टी.व्ही नसल्याने खालापूर पोलीस प्रशासनाला चोरांना पकडण्यास मुश्किल झाले होते.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांच्या योग्य सूचनांच्या आधारे व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाने चोरांचा शोध घेण्यास 3 पथक तयार करण्यात आले होते.

कंपनीच्या मागील बाजुचे तुटलेले कंपाउंड व नदी असल्याने सिलेंडर नक्की कोणत्या दिशेला चोरांनी नेले याचा थांगपत्ता लागत नव्हता. मात्र तयार करण्यात आलेले पथक आणि सूत्रांच्या आधारे पोलीस नाईक नितीन शेडगे व रणजित खराडे यांना वणवे येथील महादेव वामन वाघमारे याने त्याच्या साथीदारांसह हि चोरी केल्याचे समजले. यानंतर पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली साहा. पोलीस निरीक्षक शेखर लव्हे, पोलीस हवालदार योगेश जाधव, पोलीस नाईक नितीन शेडगे व रणजित खराडे, सचिन व्हस्कोटी, हेमंत कोकाटे, पोलीस शिपाई दत्तात्रेय किसवे व चालक जगदीश वाघ यांच्या संपूर्ण टीम ने महत्वपूर्ण कामगिरी बजावत वणवे, लाखरण (कर्जत), हाल खुर्द, लोहोप, मोहोपाडा आदी भागांतून एक एक करत आरोपी ताब्यात घेऊन त्यांची तपासणी केली असता सदर माल मुंब्रा, पुणे, देहूरोड या ठिकाणी विक्री केल्याचे सांगितले.

माल खरेदी करणारे 2 आरोपींसह अद्याप 79 सिलेंडर व चोरी करतानाचे वाहन वापरात आणले तेही खालापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात घेण्यात आले आहे. सदर आरोपींना 17 जुन रोजी ताब्यात घेण्यात आले असून 22 जुन पर्यंतच्या रिमांड पोलीस कोठडी नंतर पुन्हा 25 जुन पर्यंत पोलीस कोठडी वाढवून घेण्यात आली आहे.

सदर गुन्ह्यांची नोंद खालापूर पोलीस ठाण्यात र.जि नं. 102/2020 तसेच 66/2020 प्रमाणे भादंवि कलम 380 अशी करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली साहा. पोलीस निरीक्षक शेखर लव्हे करीत आहेत.