• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

काव्य गायनातून समाज प्रबोधन करणारे कलावंत कोरोना बाधित काळात उपेक्षित !


कर्जत (भिसेगाव) : सुभाष सोनावणे

अनाधी काळापासून या समाजामध्ये गीत गायनातून प्रबोधन करणे चालू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळी शाहीर पोवाडे गाऊन महिमा, शौर्य , कथा सांगून शरीरात अंगार फुलवत होते, तर संत तुकाराम महाराज यांनी ओव्या, भजन गाऊन तर संत रोहिदास महाराज, संत कबीर यांनी भारुड, दोहे गाऊन समाज प्रबोधन केले. "जे न देखे रवी, ते देखे कवी" या उक्तीप्रमाणे आज खऱ्या अर्थाने समाजामध्ये समाज प्रबोधनाचे काम हे कवी, गायक, कलावंत आपल्या काव्यातून - गायनातून करत असतात .

फुले -शाहू -आंबेडकरी विचारांचे त्याचप्रमाणे जुन्या रूढी परंपरा, अनिष्ट चालीरीती, अंधश्रद्धा, भ्रष्टाचार, कुपोषण, बालमजुरी ,महिलांवर होणारे अन्याय, जातीभेद यासारख्या विषयावर कवी काव्य तयार करतात तर त्यास संगीतमय करून गायक ते गीत श्रोत्यांच्या समोर ठेवून त्यांना तल्लीन होण्यास लावतात , तर त्यांच्या गायनाने शक्ती, भक्ती, आनंद, दुःख, शूरगाथा, वीरगाथा, अशी जनजागृती होऊन क्रांतीची ज्योत पेटवून त्यांचे काव्य भावी पिढीस उपयुक्त ठरते. महाराष्ट्राच्या भूमीत दिवंगत प्रल्हाद शिंदे , विठ्ठल उमप , यांसारखे गायक उदयास आले, कि ज्यांच्या गायनातून महाराष्ट्राच्या जनतेला "अमूल्य ठेवा " मिळाला . त्यांचे अनेक शागीर्द - शिष्य कर्जतमध्ये आहेत , याच कर्जत सारख्या गीत गायनाच्या पंढरीत अव्वल दर्जाचे असलेले कवी , गायक , ढोलक पट्टू , तबला वादक , पेटी , पियानो , बॅन्जो वाजविणारे , कार्यक्रमाशिवाय हातात पैसा मिळत नसल्याने मदतीच्या प्रयत्नात आहेत .१९ फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या १४ एप्रिल या जयंती उत्सवानंतर चालू होणारे समाज प्रबोधनाचे गीत गायन कव्वालीचे कार्यक्रम , तसेच वाढदिवस , फंक्शन , रात्र जागविणे कार्यक्रम , या कोरोना विषाणू संसर्ग महामारीच्या काळात कार्यक्रम होत नसल्याने या कार्यक्रमावर अवलंबून असणाऱ्या हातावर कमाविणाऱ्या कलावंतांच्या हाताला काम नसल्याने पैशाअभावी जिणे जगणे व कुटुंबाला सांभाळणे अवघड होऊन बसले आहे .

या कलावंतांकडे कोणीच लक्ष देत नसून त्यांची झालेली उपेक्षा म्हणजे उपाशी पोटी रहाणे , असेच आहे . सहनही होत नाही , आणि सांगताही येत नाही , अशी परिस्थिती कर्जत तालुक्यातील कवी , गायक व इतर कलावंतांचे झाले असून त्यांची नजर हि मदतीची आस धरून आहे , मात्र या कोरोना विषाणू ५० दिवसाच्या काळानंतरही हे कलावंत मदतीविना उपेक्षित दिसून येत आहेत .मात्र यांच्याकडे सर्वांनीच पाठ फिरवलेली दिसून येत आहे .