• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

कुर्यात सदा मंगलंम - शुभ लग्न सावधान, ह्यावर्षी अक्षता टाकायला कोरोनाचे विघ्न !


कर्जत (भिसेगाव) : सुभाष सोनावणे

तुळशीचे लग्न लागल्यावर लग्नाच्या मुहूर्ताला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. नवरी मुलीला बघण्यापासून ते लग्न होऊन नवरी ला वरातीत वाजत गाजत सासरी नेण्यापर्यंतचा सर्व कार्यक्रम म्हणजे लग्न समारंभ , मात्र यावर्षी कोरोना विषाणू संसर्ग महामारीच्या मुहूर्तावर कोणीही लग्न करण्यास उत्सुक नसल्याने कुर्यात सदा मंगलंम - शुभ लग्न सावधान , हि शुभ मंगलाष्टके ऐकण्यास देखील मिळणार नाहीत . त्यामुळे तरुणाई सध्या बिथरली असून , हा वर्ष फुकट जाण्याबरोबरच या लग्नावर अवलंबून असणाऱ्या इतर धंदेवाईक वर्हाडयांचे देखील कोरोनाने पुरते कंबरडे मोडले आहे .

राज्यात कोरोना महामारीचे संकट मार्च महिन्यापासून आले . तत्पूर्वी अनेकांनी आपल्या सात जन्माची सोबतीण पती - पत्नीच्या रुपात अगोदरच पसंत केले होते . मात्र लॉकडाऊन , संचारबंदी , मास्क लावणे , सोशल डिस्टन्ससिंग सारखे आदेशात लग्न करणे म्हणजे कपडे खरेदी नाही , लग्न पत्रिका नाही , हळदीची मज्जा नाही, डीजे नाही, डान्स नाही , बँड - बाजा - बारात शिवाय अक्षता टाकायला सह परिवारा बरोबरच नाती - गोती, मित्र - मैत्रिणी, गावकरी , नसतील तर त्या शुभ लग्नाला काय मजा असेल , वर - वधूला भेटण्यासाठी रिसेप्शन नाही व या सर्व सोहळ्याची आयुष्यभर आठवण रहावी , म्हणून काढलेले फोटो , शूट देखील करायची परवानगी नसल्यावर लग्नाची गोडीच अवीट होऊन बसल्याने कोरोनाच्या काळात सर्वत्र लग्न पुढे ढकलण्यात येत आहेत . मात्र एका लग्नावर वरील सर्व अवलंबून असल्याने सर्वांच्याच हाताची कामे थांबली असून त्याचे परिणाम त्यांच्या कुटुंबावर झाला आहे .

प्रत्येकाच्या घरात लग्न कार्य हे होतेच , मात्र या लग्नाच्या आड कित्तेक हात काम करत असतात , हे कोरोनाच्या परिस्थितीत उघड झाले आहे . लग्नपत्रिका , मंडप डेकोरेटर्स , जेवण बनविणारे केटरर्स , गाडीवाले , बॅन्जो - बाजा , डीजे , कपडे खरेदी , दागिने खरेदी , चप्पल - बूट खरेदी , फोटोग्राफर , शूटिंग , ब्युटीपार्लर , लग्न हॉल , फेटेवाले , भटजी , हार - तुरे , आहेर वस्तू , अन्न- धान्य खरेदी , थंड पाण्याची सोय , मटण - चिकन खरेदी , आणि सर्वांत महत्वाचे म्हणजे हळदी समारंभात मजा आली पाहिजे म्हणून तळीरामांसाठी मनसोक्त " नाइंटी " ची सोय . आदी दुकानदार व सेवा देणाऱ्या हातांना लग्न समारंभ होणार नसल्याने कोरोना विषाणूने या सर्वांना धोबीपछाड केले असून रोजगारा अभावी पुढील दिवस कसे जाणार , या चिंतेत हे सर्व असून , यंदा कर्तव्य नाही , असेच अखेर म्हणावे लागेल आणि म्हणूनच अक्षता टाकायला या सर्वांस कोरोना विषाणू जबाबदार आहे , हे वेगळे सांगायला नको !