• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

Untitled


ब्युरो रिपोर्ट :-

श्रीवर्धन तालुक्यातील भोस्ते गावात सापडलेल्या एकाच कुटुंबातील पाच कोरोना बाधित रुग्णांपैकी 3 जण पूर्णपणे बरे होऊन गावात परतले आहेत. त्यांनी कोरोनाला मात दिली असून, उपचारानंतर त्यांची कोव्हिड-19 टेस्ट ही निगेटीव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. तर दोघांचा कोरोनासोबत लढा सुरु आहे.

मुंबईतील कोरोना हॉटस्पॉट असलेल्या वरळीतून भोस्ते गावात आलेल्या पाच जणांना कोरोनाची लागण झाली होती.

लॉकडाऊनच्या काळात खाजगी वाहन करुन हे पाच जणांचे कुटुंब गावात दाखल झाले होते. या कुटुंबाच्या प्रमुखाला कोरोनासदृश्य लक्षणे आढळल्यामुळे पनवेल येथे 12 एप्रिल रोजी पाठविण्यात आले होते. त्यानंतर 17 एप्रिल रोजी त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. त्यामुळे श्रीवर्धनसह संपूर्ण रायगडात खळबळ उडाली होती.

संपूर्ण भोस्ते गाव परिसर सील करण्यात आला. गावामधील सर्व नागरिकांचा प्रवेश बाहेरच्या ठिकाणी बंद करण्यात आला, तर बाहेरच्या व्यक्तीनाही गावामध्ये जाण्यास मज्जाव करण्यात येत होता. त्यानंतर या कोरोना पॉझिटीव्ह व्यक्तीच्या पत्नी आणि तीन मुलांची टेस्ट केली असता, तेही कोरोना कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले होते.

या पाच जणांपैकी तीन मुलांनी कोरोनाला यशस्वीरित्या मात दिली असून, उपचारानंतर रविवारी (26 एप्रिल) या तिघांचे रिपोर्ट हे निगेटीव्ह आले आहेत.

त्यामुळे त्यांना श्रीवर्धन तालुक्यातील भोस्ते गावात परत आणण्यात आले आहे. गावामध्ये एका बंद असलेल्या घरामध्ये सदर व्यक्तींचे विलगीकरण करण्यात आले आहे.

दरम्यान, कोरोना बाधित पती आणि पत्नी म्हणजेच या मुलांचे आई-वडिल यांची कोरोनाशी झुंंज कायम आहे. त्यांच्यावर अद्यापही पनवेल येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

तरी तालुक्यातील सर्व नागरिकांनी शासकीय सूचनांचे पालन करावे व घरातच रहावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.