• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

कोरोनाच्या संकटात खालापुरात धक्कादायक बातमी सासरच्यांच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

खोपोली : संतोषी म्हात्रे

खालापूर तालुक्यात दुर्दैवी घटना घडली असून एकच खळबळजनक चर्चा होत आहे. खालापूर तालुक्यातील बीड जांबरुग ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्या मयुरी राहुल केदारी (२४) यांनी विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मयुरीला न्याय मिळण्यासाठी मयुरीच्या आई-वडील आणि नातेवाईकांनी मयुरीच्या सासू व नवऱ्यावर कडक कारवाईची मागणी केली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पेण येथील कामार्ली येथील मंगेश कांबळे यांची बहीण मयुरी हीचा विवाह खालापूर तालुक्यातील बीड जांबरुग येथील राहुल धोंडू केदारी याच्या सोबत २०१४ मध्ये झाला होता. लग्नाला तीन वर्षे होऊनही मूल होत नसल्याने मयुरीची सासू विमल केदारी ही मयुरीला टोचून बोलून मारहाण करत असे. २०१८ मध्ये मयुरीला तिच्या पती राहुल याने ग्रामपंचायत निवडणूक लढण्यासाठी उभी केली. मयुरीने निवडणूकीसाठी माहेरून पैसे आणावे यासाठी तिचा छळ करण्यात आला. परंतु मयुरीने पैसे आणण्यास नकार दिल्याने तिला सतत मारहाण होत होती. त्याचदरम्यान मयुरीला दिवस गेल्याने थोडे दिवस पती व सासू यांची वागणूक ही बदलली होती. परंतु मयुरीला कन्या रत्न प्राप्त झाल्यामुळे पती राहुल आणि सासू विमल यांनी मयुरीला पुन्हा त्रास द्यायची सुरवात केली होती. त्यातच राहुलचे अनैतिक संबंध असल्याची माहिती मयुरीला समजताच मयुरीने पती राहुलला जाब विचारला असल्याने तिला सततची मारझोड होत होती. या त्रासाला कंटाळून दि. १४ मे २०२० रोजी मयुरीने विष प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मयुरीच्या माहेरी समजताच मयुरीचा भाऊ मंगेश कांबळे यांनी मयुरीचा पती राहुल केदारी आणि सासू विमल केदारी या दोघांविरोधात बहीण मयुरीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याची तक्रार दिली आहे.

याबाबत खोपोली पोलीस ठाणे येथे भा. द. वि. स. कलम ३०६, ४९८, अ,४९४, ३४ याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून मयुरीचा पती राहुल केदारी याला अटक करण्यात आली आहे. सदर घटनेचा अधिक तपास खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश आस्वर हे करीत आहेत.

खालापूर तालुक्यात ही घटना घडली असून ग्रामपंचायत सदस्या असलेल्या मयुरी यांना एक वर्षाची मुलगी असून ती पोरकी झाली आहे. या आत्महत्येचा सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

616 views0 comments
™© Copyright - dont copy this text™