• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नारंगी ग्रामपंचायतीचे उत्कृष्ट नियोजन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नारंगी ग्रामपंचायतीचे उत्कृष्ट नियोजन,

गरीब व गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप


वावोशी : जतिन मोरे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नारंगी ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच उज्ज्वला देशमुख आणि उपसरपंच उद्धव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सोशल डिस्टंसिंगचे काटेकोरपणे पालन करून ग्रामपंचायत हद्दीतील गरीब, गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य बाबू वाघुले, निर्मला जाधव, प्राजक्ता गायकवाड, मनीषा जितेकर, दिपक आरावकार, ग्रामविकास अधिकारी गणेश मोरे आणि कर्मचारी उपस्थित होते.

कोरोनाच्या संकटाची झळ महाराष्ट्रालाही लागली असून त्या दृष्टीने शासनाने ३ मे पर्यंत टाळेबंदी केली असून या संचारबंदीच्या कालावधीत गरीब, निराधार, मोलमजूर यांच्यावर मात्र उपासमारीची वेळ आली आहे. या अनुषंगाने आपल्या ग्रामपंचायत हद्दीतील कोणीही निराधार, अपंग, मोलमजुरी करणारे लोक, वीटभट्टीवरील मजूर, गरीब व गरजू कुटुंब उपाशी राहणार नाही याची पुरेपुर काळजी नारंगी ग्रामपंचायतीने घेतलेली दिसते. ग्रामपंचायतीने १५ टक्के मागासवर्गीय निधीतून अनुसूचित जाती आणि जमातीच्या कुटुंबांना तसेच अपंग, निराधार आणि गरीब, गरजू कुटुंबांना डाळ, मसाले, हळद, तेल, मीठ, कडधान्ये, कांदे, बटाटी, साबण असे दीड ते दोन महिने पुरेल इतके जीवनावश्यक धान्य वाटप केले आहे. तसेच ज्या कुटुंबांना रेशनिंग कार्ड नाहीत किंवा रास्त भाव धान्याच्या दुकानातून धान्य मिळाले नाही अशा कुटुंबांनाही तहसील कार्यालयातून धान्य उपलब्ध करून दिले आहे. त्याचप्रमाणे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नारंगी ग्रामपंचायतीने गावामध्ये जंतुनाशक धूर फवारणी करून ग्रामस्थांना सॅनिटायझर आणि मास्कचे वाटप केले आहे. यासाठी ग्रामपंचायतीने कोरोना नियंत्रण कक्षाची निर्मिती केली असून यामध्ये सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांचा समावेश करण्यात आला आहे. या नियंत्रण कक्षाच्या साहाय्याने संपूर्ण नारंगी ग्रामपंचायत हद्दीतील कुटुंबांना गृहभेटी देऊन त्यांना वैयक्तीक स्वच्छता, तोंडाला मास्क लावणे, सॅनिटाइझर चा वापर करणे, गर्दी टाळणे, वेळोवेळी साबणाने स्वच्छ हात धुणे अशा सूचना देऊन कोरोनाविषयी जनजागृती करण्यात येत आहे.

17 views0 comments