• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

आनंद तेलतुंबडे यांचा अंतरिम जामीन फेटाळला

आनंद तेलतुंबडे यांचा अंतरिम जामीन फेटाळलामुंबई -

भीमा कोरेगावप्रकरणात सुप्रीम कोर्टाने दिलेली मुदत संपल्यानंतर लेखक आणि प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांनी मुंबईतल्या NIA कार्यालयात जाऊन आत्मसमर्पण केलं होतं.

आनंद तेलतुंबडे यांनी आज NIAच्या कार्यालयात जाऊन 14 एप्रिल रोजी आत्मसमर्पण केलं. त्यावेळी प्रकाश आंबेडकर, रमाताई तेलतुंबडे, आनंद आंबेडकर, आमदार कपिल पाटील उपस्थित होते.

यानंतर कोर्टाने त्यांना 18 एप्रिलपर्यंत NIAच्या कोठडीत पाठवण्याचा आदेश दिला होता. आता विशेष न्यायालयाने त्यांचा अंतरिम जामीन फेटाळला आहे. त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे.

8 एप्रिल रोजी त्यांना आत्मसमर्पणासाठी मुदत वाढवून देताना यानंतर मात्र अतिरिक्त वेळ मिळणार नाही, असं न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या नेतृत्वाखालील खंडपाठीने स्पष्ट केलं होतं.

"न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान करत दोन्ही आरोपी समर्पित करतील, असं आम्हाला वाटलं होतं. मुंबईत कोर्टांचं कामकाज सुरू आहे. परंतु त्यांनी तसं केलं नाही. दोघांनाही पुरेसा वेळ देण्यात आला होता. त्यांच्या वयाचा, प्रकृतीचा विचार करून एका आठवड्याची मुदत देण्यात येत आहे, मात्र एका आठवड्यानंतर त्या दोघांना न्यायालयासमोर आत्मसमर्पण करावं लागेल," असंही सुप्रीम कोर्टाने तेव्हा म्हटलं होतं.

तेलतुंबडे आणि नवलखा यांनी वतीने युक्तिवाद करणाऱ्या वकिलांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हेही कारण दिलं होतं.

मात्र सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी या युक्तिवादाला विरोध करत, सद्यपरिस्थितीत या दोघांसाठी तुरुंग ही सगळ्यांत सुरक्षित जागा असेल असं म्हटलं.

सध्या कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे देशात लॉकडाऊन आहे, त्यामुळे आज त्यांना अटक होणार की नाही, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. तेलतुंबडे यांची अटक टळावी, यासाठी भारतातील आणि परदेशातील अनेक संस्थांनी पुढाकार घेतला असून अनेक संस्थांनी निवेदनं जाहीर केली आहेत.


आमदार कपिल पाटील यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले, "आज सरेंडर करण्याचा निर्णय त्यांचा होता. त्यांच्या कुटुंबाशी माझे चांगले संबंध आहेत. त्यामुळे मी आज त्यांच्यासोबत होतो. मला अतिशय दु:ख होत आहे. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिवशी त्यांच्याच नात जावयाला चुकीच्या आरोपाखाली सरेंडर व्हावं लागत आहे. अशा प्रसंगी त्यांच्यासोबत राहण्यासाठी मी गेलो होतो." "तेलतुंबडे हे विद्वान आहेत. लोकशाहीवादी आहेत. त्यांचा विविध विषयांवर प्रचंड अभ्यास आहे. आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे," असंही कपिल पाटील म्हणाले.


विविध संस्थांचा दोघांनाही पाठिंबा


प्रा. नंदिता नारायण दिल्ली विद्यापीठातील माजी प्राध्यापक आहेत. All India Forum for Right to Education तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन पत्रकार परिषदेत बोलताना त्या म्हणाल्या, "आनंद हे आघाडीचे कार्यकर्ते आहेत. उच्च शिक्षणाविषयी त्यांच्या विचारांचा आदर करते. त्यांचे लेख अनेक नियतकालिकांमध्ये आले आहेत. धोरणाबाबत विचारणा केली की त्यांना लक्ष्य केलं जातं. बुद्धिवंतांना लक्ष्य केलं जात आहे. दलित शिक्षण संस्थांना निधी कमी केला जात आहे. त्यांच्यावरील आरोप हास्यास्पद आहेत. सध्याचा काळ कठीण आहे, त्यामुळे सर्व मतभेद बाजूला ठेवूया आणि विवेकाने निर्णय घेऊ या."


'द वायर'ने दिलेल्या बातमीनुसार IIM अहमदाबाद या संस्थेतील शिक्षक आणि विद्यार्थी यांनी एकत्र येऊन एक निवेदन जारी केलं आहे. आनंद तेलतुंबडे यांच्यावर या प्रकरणात लावलेले आरोप अनियमित स्वरुपाचे आणि मानवाधिकांरांचं उल्लंघन करणारे आहेत, असं या निवेदनात नमूद केलं आहे.

अमेरिकन बार असोसिएशनच्या एका अहवालानुसार भीमा कोरेगाव प्रकरणात विविध विचारवंतावर ठेवलेल्या आरोपांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत.

"या प्रकरणात ज्या व्यक्तींवर आरोप लावले आहेत त्यांच्याविरुद्ध ठोस पुरावे सरकारकडे नाहीत. तसंच त्यांच्यामुळे देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होतो हे सांगणारा कोणताही ठोस पुरावा नाही. समाजातील वंचितांची सेवा करण्यापासून परावृत्त करण्यासाठी अशा प्रकारचे आरोप लावण्यात येत आहेत."

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या बातमीनुसार IIM बंगळुरूच्या 53 शिक्षक, विद्यार्थी आणि इतर कर्मचाऱ्यांनी आनंद तेलतुंबडे यांना पाठिंबा दर्शवला आहे.

"कॉर्पोरेट क्षेत्रात त्यांच्या योगदानाबद्दल आम्हाला त्यांचा अभिमान आहे. मात्र त्यांनी भारताच्या राज्यघटना आणि अशा विविध विषयांवर त्यांनी वेळोवेळी उत्तम भाष्य केलं आहे. काही संशयास्पद पुरावांच्या आधारे तेलतुंबडेंसारख्या विचारवंतावर असे आरोप करणं धोकादायक आहे," असं या निवेदनात म्हटलं आहे.

त्याचबरोबर IIT मधील माजी विद्यार्थ्यांनी तेलतुंबडेंना पाठिंबा दर्शवला आहे. "सध्याचा कोव्हिड-19 चा प्रसार आणि त्यांचं वय पाहता सध्या त्यांना तुरुंगात पाठवणं धोकादायक आहे," असं त्यांचं मत आहे.

तर, भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही ट्वीट करत तेलतुंबडेंना पाठिंबा दर्शवला आहे.

"आनंद तेलतुंबडे हे भारतातील अत्यंत महत्त्वाचे बुद्धिवादी विचारवंत आहेत. अन्यायाविरोधात ते कायम आवाज उठवत असतात. त्यांची अटक तात्काळ थांबवायला हवी, तसंच सर्व राजकीय विचारवंताची सुटका करायला हवी," असं ते म्हणाले.