• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

अथक प्रयत्न करून गुंडगे परिसराची वीज झाली पूर्ववत !


कर्जत (भिसेगाव) : सुभाष सोनावणे

निसर्ग चक्री वादळाच्या तडाख्यात कर्जत शहरातील गुंडगे प्रभागात ठाकूरवाड़ी येथील एक मोठे झाड विजेच्या खांबावर पडल्यामुळे चार दिवस सदर परिसर अंधारात होता , त्यामुळे विश्वनगर हा भाग देखील वीज व पाणी विनाच होता . त्यामुळे नागरिकांची खूपच गैरसोय झाली . तरी चार दिवस अथक प्रयत्न करून वीज कंपनी व कर्जत नगर परिषदेच्या कर्मचा-यांनी हा तिढा सोडवला .

३ जुनचा दिवस म्हणजे निसर्ग चक्रिवादळाचा दिवस , त्याचीच दहशत आणी त्याच्याच बोलबाला ...सोसाट्याचा वारा आणी त्या बरोबर येणारा पाउस...कोणीही घराबाहेर नाही , सर्वत्र शांत परिसरात कोणी बाहेर पडत नव्हते तर काहींना भितीने घरात बसवत नव्हते..कर्जत हे समुद्राच्या कडेला नाही पण चक्रीवादळाचा तडाखा आणि राडा काही कमी नव्हता हे सर्वांनी अनुभवले . कुठे झाडे पडली ....तर कुठे घराचे पत्रे उडून गेले.अगदी असेच गुंडगे गाव आणी परिसरात घडले..झाडे उन्मळून तर फांद्या वीज कंपनीच्या वाहिनींवर पडल्यामुळे वीज गेली ,अनेक नागरिकांच्या घरांची पडझड झाली.मोबाइल नेटवर्क नाही.. कुठे काय घडतय , याची वेळेवर खबरच मिळत नव्हती.संध्याकाळी वादळ थंडावले , आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला . मात्र दोन चार ठिकाणी मोठ मोठी झाडे पडली होती.वननिवास शेजारी भले मोठे झाड विद्युत वाहिनीवर पडून त्याच्या वजनाने विजेचा खांब अक्षरशः मधून वाकला होता.नशीबाने कोणतीही जिवित हानी झाली नाही.


वीज कंपनीचे कनिष्ठ अभियंता श्री . साबळे हे तातडीने येऊन त्यांच्या बरोबर लाईनमन श्री.खंडागळे यांनी कर्जत नगर परिषदेच्या कर्मचारी यांच्या मदतीने अथक प्रयत्न करून गुंड़गे परिसरातील वीज सुरु झाली . याकामी माजी नगरसेवक श्री.दिपक मोरे , यांचे सहकार्य लाभले .कर्जत शहराचे कनिष्ठ अभियंता श्री.साबळे व लाईन मन श्री.सुरेख खंडागळे व त्यांची टीम तसेच पालिकेचे आरोग्य कर्मचारी यानी अथक मेहनत घेवुन विज पुरवठा पुर्ववत केला.